एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:09 PM2021-07-23T14:09:48+5:302021-07-23T14:13:28+5:30

भाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष, बावनकुळे यांचं वक्तव्य. इतके दिवस झाले तरी खडसेंना मंत्रिपद दिलं नाही, बावनकुळे यांची टीका.

bjp leader chandrashekhar bawankule slams ncp eknath khadse did not gave ministry yet | एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे 

एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे 

Next
ठळक मुद्देभाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष, बावनकुळे यांचं वक्तव्य.इतके दिवस झाले तरी खडसेंना मंत्रिपद दिलं नाही, बावनकुळे यांची टीका.

जळगाव : "भाजप हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ते पक्ष सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही," असे स्पष्ट मत माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावात व्यक्त केले. "इतके दिवस झाले तरी राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपद दिले नाही. अजूनही त्यांना लटकवून ठेवले आहे," अशी टीकादेखील बावनकुळे यांनी केले.

भाजपच्या २५ लाख युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, "भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६० टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल. एकनाथ खडसे यांनाही पक्षाने खूप काही दिले. मी स्वतः तसेच पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे."

त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. कारण भाजप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, नेत्यांवर नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी खडसेंच्या आरोपांचाही समाचार घेतला.

Web Title: bjp leader chandrashekhar bawankule slams ncp eknath khadse did not gave ministry yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.