...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:52 IST2021-08-24T16:49:14+5:302021-08-24T16:52:16+5:30
Narayan Rane Arrest: नारायण राणे यांना करण्यात आली होती अटक. राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान.

...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Narayan Rane Arrest: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीपोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप केला.
"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!," असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!
हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane
अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला. नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.