Eknath Khadse : अखेर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला?; शरद पवारांच्या संकेतानंतर हालचालींना वेग

By प्रविण मरगळे | Published: October 20, 2020 11:37 AM2020-10-20T11:37:44+5:302020-10-20T11:41:00+5:30

Eknath Khadse, NCP News: मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे.

BJP Leader Eknath Khadse to enter the NCP on 22 oct in presence of Sharad Pawar | Eknath Khadse : अखेर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला?; शरद पवारांच्या संकेतानंतर हालचालींना वेग

Eknath Khadse : अखेर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला?; शरद पवारांच्या संकेतानंतर हालचालींना वेग

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार, कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाखडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याची माहिती खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते - पवार

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे  Eknath Khadse  यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  Sharad Pawar यांनी खडसेंबाबत केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. येत्या २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत टीव्ही ९ ने वृत्त दिलं आहे. दरम्यान खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना काय मिळणार?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजपातच राहतील याचा मला विश्वास आहे. पक्षाकडून कोणत्याही सदस्याने राजीनामा दिला नाही, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मला कोणत्याही नेत्याचा राजीनामा मिळाला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना यांना पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केला. त्यामुळे, पत्रकारांमध्ये हशा पिकला. 

खडसे पक्षांतर करणार नाही- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेतही फडणवीसांना हा प्रश्न विचारला असता, असे मुहूर्त रोज सांगितले जातात, मी त्यावर बोलणार नाही असं सांगत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य करणं टाळलं.

ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून चाचपणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली.

Read in English

Web Title: BJP Leader Eknath Khadse to enter the NCP on 22 oct in presence of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.