आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत?'; पडळकर यांचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:11 AM2021-08-26T11:11:38+5:302021-08-26T11:12:53+5:30
Gopichand Padalkar Criticizes Sanjay Raut : पडळकर यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका. हुजुरेगिरीला बावाचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत?, पडळकर यांचा सवाल.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "आपल्या हुजुरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत? असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय?," असा सवालही पडळकर यांनी केला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांवर टीकेचा बाण सोडला.
"असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय? जो फुटला तर तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. नारायण राणे यांच्यावरील सूडाची कारवाई ही कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. पण पोलिसांना आयाबहिणींवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाई यांना अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?," असा सवालही पडळकरांनी केला.
अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो कायद्याच्या' फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील.@rautsanjay61@BJP4Maharashtra@ShivSena@SaamanaOnlinepic.twitter.com/hPsWtHQ9f7
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 26, 2021
"ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचं मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करताय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान उजळ माथ्यानं माहाराष्ट्रात फिरतो. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावर कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत," असा आरोपही त्यांनी केला.
"सामनाचं 'बाबरनामा'त रुपांतर"
मला बाळासाहेबांच्या दैनिक सामनाचं दैनिक बाबरनामात रूपांतर करणाऱ्यांना हेच विचारायचंय की त्यावेळी तुमची अस्मिता कोणाच्या पायापुढे लोटांगण घालते. कोणापुढे तुम्ही नतमस्तक होता. संजय राऊत कंबरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला, अन्यथा तुमच्या हम करे सो कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील अशी टीकाही पडळकर यांनी केली.