चीन, चिता जगभराची समस्या, पण चिंता काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न; भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 08:44 PM2021-05-10T20:44:34+5:302021-05-10T20:46:47+5:30
Coronavirus : मोदींनी जनतेला फक्त 'चीनचा कचरा, चिंता व चिता' हे तीन 'चि' दिले आहेत, अशी पटोले यांनी केली होती टीका
"भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकिकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महासाथीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त 'चीनचा कचरा, चिंता व चिता' हे तीन 'चि' दिले आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"मोदींनी देशाला 'चीनचा कचरा, चिंता आणि चिता' हे तीन 'चि' दिले", नाना पटोलेंचा हल्लाबोल
"नानाजी चीन व चिता ही जगभराची समस्या आहे. चिंता काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. देशातून झपाट्याने जनाधार गमावल्याने काँग्रेसला अस्तित्वाची चिंता वाटणे सहाजिक आहे. ती अवस्था मोदींमुळे नाही, तुमच्या नेतृत्वाची कर्तबगारी आहे," असं म्हणत उपाध्ये यांनी पटोले यांना ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिलं.
मोदींनी ‘चीनचा कचरा, चिंता, चिता’ हे तीन ‘चि’ दिले -@NANA_PATOLE, नानाजी चीन व चिता ही जगभराची समस्या आहे. चिंता कॉंग्रेसचाअंतर्गत प्रश्न आहे. देशातूनझपाट्याने जनाधार गमावल्यानेकॉंग्रेसला अस्तित्वाचीचिंता वाटणे सहाजिक आहे. तीअवस्था मोदींमुळे नाही. तुमच्या नेतृत्वाचीकर्तबगारी आहे
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 10, 2021
काय म्हणाले होते पटोले?
"घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहेत," असे नाना पटोले म्हणाले.