"अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:09 IST2021-04-08T15:08:21+5:302021-04-08T15:09:23+5:30
Corona Vaccine : भाजपचा जयंत पाटलांना टोला, केंद्राकडून लसींचा योग्यप्रकारे पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप

"अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका"
"देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र, तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. यावरून आता भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांन जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.
"किमान शरद पवार यांना तरी विचारायचं. ते आता फेसबुक लाईव्हवर म्हणाले केंद्र सहकार्य करत आहे. इथलं कोरोना हाताळणीतील ढळढळीत अपयश लपवयाला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे. पण शरद पवार यांना खोटं पाडू नका," असं उपाध्ये म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील यांना टोला लगावला.
किमान @PawarSpeaks यांना तरी विचारायचे. ते आता फेसबुक लाईव्हवर म्हणाले केंद्र सहकार्य करीत आहे. इथल कोरोना हाताळणीतील ढळढळीत अपयश लपवयाला केंद्रावर टीका करण तुम्हाला भाग आहे पण पवार साहेबांना खोट पाडू नका https://t.co/ZOk90oHYku
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 8, 2021
काय म्हणाले होते पाटील?
"स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहे," असं पाटील म्हणाले होते.
"बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे," असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. "कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का?," अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राला ८५ लाख लसी
महाराष्ट्राला ८५ लाख लसी मिळाल्या आहेत मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १२.३० कोटी तर अक्टिव्ह रुग्णसंख्या जवळपास ४. ७३ लाख इतकी आहे. गुजरातला ८० लाख लसी मिळाल्या तिथे लोकसंख्या ६.५० कोटी आहे तर अक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास १७ हजार आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.