अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:37 PM2021-03-31T14:37:12+5:302021-03-31T14:38:47+5:30

Anil Deshmukh : सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चांदीवाल न्या. कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार असल्याचा आदेश काढला होता.

bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government over committee on anil deshmukh allegations | अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा 

अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा 

Next
ठळक मुद्देन्या. कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार भाजपनं साधला जोरदार निशाणा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सध्या पोलीस महासंचालक (गृहरक्षक दल) असलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी या बाबतचा आदेश काढला. यावरून आता भाजपनं महाविकास आघाडीवर टीकेचा बाण सोडला आहे. "राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारने १ एप्रिलच्या आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवले आहे," अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्राला अनेक दिवस उलटले तरी सरकार ढिम्मच होते.  मात्र, उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार हे दिसल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहीलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे," अशी टीका उपाध्ये यांनी केली.

हवा तसा अहवाल तयार करून घेतला जाण्याची शक्यता

"लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा  गृहमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. असे असताना या विभागाकडे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सोपवली तर ती निःष्पक्ष असेल याची अजिबात खात्री नाही. ज्या प्रमाणे महावसूली सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल जसा हवा होता तसा तयार करून घेतला त्याचप्रमाणे आता या चांदीवाल समितीकडून सुद्धा आपल्याला हवा तसा अहवाल तयार करून घेतला जाण्याचीच अधिक शक्यता आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी उपाध्ये यांनी गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केलं. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची  भेट झाली की नाही याविषयी भाजपाकडून कुठलेच वक्तव्य केलेलं नाही. या विषयावर सुरूवातीपासून कोण बोलत आहे व राज्य सरकार किती ठाम आहे याविषयी वारंवार कोणाला सांगत रहावे लागले ? त्यामुळे नक्की कोणाचे पित्त खवळले, हे स्पष्ट आहे," असंही ते म्हणाले.

Web Title: bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government over committee on anil deshmukh allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.