"मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 06:55 PM2020-11-27T18:55:03+5:302020-11-27T18:58:52+5:30
Narayan Rane News : भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
सिंधुदुर्ग/मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीवरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मर्दाला मर्द असल्याचे सांगायची गरज लागत नाही, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
नारायण राणे म्हणाले की, मुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे असं सांगताहेत. मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागल नाही. आता यांची पण एकदा चाचणी करावी लागेल, असेही नारायण राणे म्हणाले. सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे देताहेत. मात्र हे स्वत:च पडणार आहेत, असे भाकितही नारायण राणे यांनी केले.
आजच्या मुलाखतीमध्ये विरोधकांना धमक्या देणं, ईडी, सीबीआयला धमक्या देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आतापर्यंत हात धुवत होतो आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही. हात धुवून कुणाच्या मागे लागणार ईडीच्या, सीबीआयच्या की भाजपाच्या नेत्यांच्या? तुमचं ५६ आमदारांचं सरकार किती दिवस चालेल. केंद्राच्या अखत्यारीतील संस्थांवर राज्य सरकार काय कारवाई करू शकते, अशी विचारणाही नारायण राणेंनी केली.
मुख्यमंत्र्यांनी लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं . शेतकऱ्यांसाठी काय केलं, हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच सुशांत सिंह राजपूत आणि दीशा सालियन यांचं प्रकरण आम्ही विसरलेलो नाही, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. आपल्याला प्रशासकीय ज्ञान नाही असे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री स्वत: कार चालवत मंत्रालयात गेल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. एक वर्षाचा निष्क्रिय कारभार, अधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला.
हात धुवून मागे लागण्याच्या धमक्या देऊ नका, कोण कुणाच्या मागे लागेल हे कळेल. आम्ही मागे लागलो तर झोप येऊ देणार नाही. १०० जणांच्या कुंडल्या माहिती आहेत. बंद दरवाजा आडच्या मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्याही अनेक गोष्टी ठावूक आहेत, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.