हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झालाय; नितेश राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 11:02 AM2021-08-07T11:02:00+5:302021-08-07T11:04:25+5:30
Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग.
कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी दुकानांची वेळही वाढवण्यात आली आहे. परंतु धार्मिक स्थळं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. मंदिरं उघडण्यास परवानगी नसल्यानं भाजपचे नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
"२ दिवसात लोकल चालू, १७ ऑगस्ट पासून शाळा चालू, मग २ डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का?, हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झाला आहे," असं म्हणत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला.
2 दिवसात लोकल चालू ..
— nitesh rane (@NiteshNRane) August 7, 2021
17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..
मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???
हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ??
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!
काही दिवसांपूर्वीच राज्यातील कमी होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काही जिल्हे सोडून निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स सुरू करण्यास परवानगी असली तरी मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. तसंच राज्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहणार आहेत.