पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाल्या...
By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 05:39 PM2020-11-26T17:39:36+5:302020-11-26T17:40:14+5:30
ठाकरे सरकारला शुभेच्छा देत पंकजा मुंडे बरसल्या; विविध विषयांवरून जोरदार टीका
मुंबई: राज्यातल्या ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षी आगळंवेगळं सरकार सत्तेवर आलं. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात वारंवार गोंधळ पाहायला मिळतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी कोरोना संकट, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, मराठा आणि धनगर आरक्षणावर भाष्य करत सरकारचा समाचार घेतला.
'सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यांना मतदारांकडून जनादेश नव्हता. मात्र तरीही त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे सरकार टिकवणं याच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. जनहित त्यांच्यासाठी प्राधान्याचा विषय नव्हता,' अशी टीका केली. अंगावर येणाऱ्यांच्या मागे हात धुवून लागण्याचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'लढाई मुद्द्यांची असावी, वैयक्तिक नसावी. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपावी. आम्हीदेखील जपू,' असं मुंडे म्हणाल्या.
अनेक निर्णयांमधून सरकारचा गोंधळ दिसत असल्याचं पंकजा यांनी सांगितलं. 'सरकार स्थापन झाल्यावर लगेच टीका करणं मला प्रशस्त वाटत नाही. त्यामुळेच सुरुवातीला कोरोना संकटात मी टीका केली नाही. पण त्यानंतर अनेकदा सरकार गोंधळलेलं दिसलं. शाळा सुरू करण्याचा निर्णय असो वा मग अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा, सरकारमधील गोंधळ वारंवार समोर आला,' अशी टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणाबद्दल आमच्या सरकारची भूमिका अतिशय सकारात्मक होती. पण आताच्या सरकारच्या भूमिकेमुळे समाजात नाराजी आणि संताप आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही कायम आहे. धनगरचं धनगड करण्यासाठी ७० वर्षे लागतात, ही बाब दुर्दैवी आहे, असं पंकजा म्हणाल्या. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारनं हात थोडा सैल सोडावा. राज्याला केंद्राची मदत मिळणं क्रमप्राप्त आहे. पण राज्य सरकारनं आधी मदत करून मग केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा मार्ग वापरता येतो, असं पंकजा यांनी सुचवलं.