Arnab Goswami: आणीबाणी 2.0! महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी; गोस्वामींच्या अटकेनं वातावरण तापलं
By कुणाल गवाणकर | Published: November 5, 2020 12:55 PM2020-11-05T12:55:59+5:302020-11-05T12:56:48+5:30
Arnab Goswami: नवी दिल्लीत भाजप नेत्यानं लावले इंदिरा गांधी, उद्धव ठाकरेंचे फोटो असलेले पोस्टर
नवी दिल्ली: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर 'आणीबाणी 2.0' असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.
आपातकाल 2.0 pic.twitter.com/dkh1Ye0ubM
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) November 5, 2020
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलरसारखे वागत असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं होतं. 'महाराष्ट्रात आणीबाणीसारखी स्थिती असून उद्धव ठाकरे हिटलरसारखे वागत आहेत. शक्य तितक्या लवकर हे सरकार बरखास्त करण्यात यावं,' असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा
अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगडच्या अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे. गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनावणीवेळी अर्णब गोस्वामीला कोर्टात हजर केलं तेव्हा नेमकं काय घडलं? न्यायधीशांनी खडसावलं
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं. अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत. पोलिसांनी मला मारहाण केली असल्याचा आरोप अर्णब यांनी केला. गोस्वामी यांच्यासह या प्रकरणातील आणखी दोन आरोपींनादेखील १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.