"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:35 PM2024-10-17T19:35:36+5:302024-10-17T19:36:09+5:30
Manoj Jarange Maharashtra Election: मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला विशेषतः भाजपाविरोधात जाहीरपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Updates: आचारसंहिता लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. जरांगे पाटील जाहीरपणे महायुती आणि भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. जरांगेंकडून थेट फडणवीसांनाच घेरत असून, आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर पलटवार केला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, "सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्यासारखे वाटताहेत. दुर्दैवाने आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचं हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असं आम्हाला वाटलं होतं. मराठ्यांचं आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता, ते देवेंद्र फडणवीसांच्या नावाने टाहो, आक्रोश करत सकाळ-दुपार-संध्याकाळ बोलताहेत, हे दुर्दैवी आहे."
मनोज जरांगेंना भाजपाचा सवाल
"कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं त्यांचं पहिल्यापासून आजपर्यंत सुरू आहे. तरीही माझं त्यांना सांगणं आहे की, आजही मराठा समाज आपलं ऐकेल, बोलले; तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बोला, त्यांच्या फायद्याचं बोला. तुमची आताची भाषा आहे, ती कोणाची भाषा आहे?", असा सवाल प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना केला.
"आपण भाजपाचे उमेदवार बघून टार्गेट करण्याचे नियोजन, ही खेळी समजण्या इतका महाराष्ट्र दूधखुळा राहिलेला नाही. जर खरंच तुमच्यामध्ये धमक असेल, तर तुम्ही स्वतः निवडणूक लढवा. उमेदवार उभे करा. सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावं. किंवा विशिष्ट संख्येत आमदार निवडून आणून सरकारला विधिमंडळात विषय मार्गी लावण्यासाठी भाग पाडावं", असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिले.
महाविकास आघाडी पोळी भाजतेय -दरेकर
"आपला कुणीतरी वापर करतंय. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी पोळी भाजतेय. त्याला तुम्ही बळी पडत आहात. हे मराठा समाजाचा घात करत आहात, हे तरुणांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना हे आवडतंय नाहीये. आजही सांगतो तुम्हाला राजकारणापलिकडे जाऊन डोक्यावर घेऊ, तुम्ही राजकीय कपडे घातलले आहेत, ते बाजूला काढा", असे प्रवीण दरेकर म्हणाले.
"ज्या दिवशी तुम्ही पाडापाडीची भूमिका घ्याल. शरद पवारांना, महाविकास आघाडीला मदत करणारी भूमिका असेल, त्या दिवशी मराठा समाजाचा, विशेषतः तरुणांचा भ्रमनिरास झालेला असेल", अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.