"स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:29 PM2021-03-22T16:29:04+5:302021-03-22T16:32:07+5:30
भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल. फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणाले होते पवार.
Pravin Darekar On Parambir Singh Letter Bomb: मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मोठा खुलासा केला. "परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं ते म्हणाले होते. दरम्यान, यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणावरून जोरदार टीका केली.
"खरंच... स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?, थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा," असं म्हणत दरेकर यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. "अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलेला दिसतोय. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है," असं दुसरं ट्वीट करत त्यांनी अनिल देशमुखांवर टीकेचा बाण सोडला.
खरंच....
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 22, 2021
स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?
थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा!
अनिल देशमुखांना वाचवायचचं,
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 22, 2021
असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय!
१५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते ?
कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही!
"ये पब्लिक है, ये सब जानती है!" pic.twitter.com/1ityfrIYWN
काय म्हणाले होते शरद पवार?
"अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय", असं शरद पवार म्हणाले होते.
वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी
अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाइन होते. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं दिसून येत आहे, असंदेखील शरद पवार यांनी नमूद केलं होतं.