"राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 02:05 PM2021-01-14T14:05:37+5:302021-01-14T14:07:52+5:30
भाजपा नेते राम कदम यांचा सवाल
बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिंमडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाराशिव- उस्मानाबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये धाराशिव असा उल्लेख करण्यात आल्यानंतर भाजपा नेते आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.
"राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार? सत्ता तुमची आहे, कोणी अडवलं तुम्हाला? की निवडणुका जवळ आल्या की फक्त नौटंकी? ज्यानी राममंदिराच्या भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केले न्यायालयात निर्णय प्रलंबित केला त्यांच्यासोबत सत्ता?," असे सवाल राम कदम यांनी केले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. तसंच हे का तुमचं हिंदुत्व असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव , संभाजीनगरच्या नामकरणची तारीख कधी सांगणार? सत्ता तुमची आहे कोणी अडवले तुम्हाला? का निवडणुका जवळ आल्या की फक्त नौटंकी? ज्यानी राममंदिराच्या भूमिपूजनवर प्रश्न उपस्थित केले न्यायालयात निर्णय प्रलंबित केला त्यांच्या सोबत सत्ता? https://t.co/ZS3ENlQVkI
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) January 14, 2021
हेच तुमचे हिन्दुत्व?
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) January 14, 2021
राम कदम चर्चेत
पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं म्हटलं जात आहे. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. खैरमोडे यांना भाजपच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपही समोर आली होती. दरम्यान, यानंतर अद्यापही त्या ऑडियो क्लिपमध्ये आपला आवाज आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.