"...मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:46 PM2021-03-19T15:46:53+5:302021-03-19T15:49:20+5:30
BJP Leader Ram Kadam criticized NCP : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अधिकारी आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अधिकारी आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते, असा आरोप केला होता. या आरोपावरून भाजपाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. (BJP Leader Ram Kadam criticized NCP over tweets against Devendra Fadnavis of police connection)
"राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?," असा सवाल राम कदम यांनी ट्विटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. "देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत‘ आहे.
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) March 19, 2021
एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का? https://t.co/jVcPuG11qy
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या घडामोडींनंतर विरोधीपक्ष भाजपाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून या बदल्या पुरेशा नसल्याचे म्हणत यामागे असणाऱ्या राजकीय शक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
(मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र)
'राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे'
दोन दिवसांपूर्वी भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्ले चढवले. केवळ पोलीस आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यापाठोपाठ आता नारायण राणे यांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.