अब की बार एनडीए की सरकार? भाजपाची मित्रपक्षांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 09:40 AM2019-05-07T09:40:34+5:302019-05-07T09:47:29+5:30
भाजपा नेते राम माधवांचं सूचक विधान
नवी दिल्ली: यंदा भाजपाला गेल्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण बहुमत मिळणार नाही, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी दिले आहेत. यंदा केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासू शकते, असं माधव म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.
आम्हाला 271 जागा मिळाल्या, तर आनंदच आहे. अन्यथा मित्रपक्षांच्या सोबतीनं आम्ही अगदी आरामात सरकार स्थापन करू, असं राम माधव म्हणाले. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पक्षाला नुकसान झाल्यास, त्याची भरपाई ईशान्य, पूर्वेतल्या राज्यांमधून आणि पश्चिम बंगाल, ओडिशात होऊ शकते, असं म्हणत राम माधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला उत्तर प्रदेशात नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली.
पूर्व भारतात आम्ही अतिशय उत्तमपणे प्रचार केला. तसाच प्रचार आम्ही दक्षिणेत केला असता, तर आम्ही आणखी चांगल्या परिस्थितीत असतो, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं. यंदाच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना माधव यांनी भाजपाला फटका बसू शकतो, याची अप्रत्यक्ष कबुली दिली. गेल्या निवडणुकीवेळी सरकारच्या विरोधात वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळे यंदा त्या निकालाची पुनरावृत्ती होईलच असं नाही, असं माधव म्हणाले.
राम माधव भाजपाचे प्रमुख नेते असून पक्षाच्या रणनितीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. संघाची पार्श्वभूमी असलेल्या माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय ईशान्य भारतात पक्षाचा विस्तार करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. भाजपा सत्तेत आल्यानंतर ईशान्य भारतात भाजपाचा दबदबा वाढला आहे. यात माधव यांची महत्त्वाची भूमिका आहे.