“सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार फोडण्याचं राष्ट्रवादीचं काम, पण त्याचा उपयोग होणार नाही, कारण...”
By प्रविण मरगळे | Published: October 24, 2020 07:24 AM2020-10-24T07:24:28+5:302020-10-24T07:27:21+5:30
BJP Ram Shinde Reaction On NCP Eknath Khadse News: जयंत पाटील सांगतात १० ते १२ आमदार संपर्कात आहेत, परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही, कोणीही भाजपा सोडणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
अहमदनगर – एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपा नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केला आहे. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार फोडला तरी आता त्याचा उपयोग होणार नाही, या घोटाळ्यातील आरोपींवर निश्चित कारवाई होईल असा टोला राम शिंदेंनी राष्ट्रवादीला लगावला आहे.
याबाबत राम शिंदे म्हणाले की, राजकारणात भरती, ओहोटी असं काही नाही, भाजपा देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. सर्वाधिक राज्य, मुख्यमंत्री, खासदार आहेत, कधी नव्हे तर काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हतं ते नरेंद्र मोदींना मिळालं आहे. जयंत पाटील सांगतात १० ते १२ आमदार संपर्कात आहेत, परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही, कोणीही भाजपा सोडणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे ते प्रमुख साक्षीदार होते, ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात असताना प्रमुख साक्षीदार फोडण्याचं काम राष्ट्रवादीने केलं आहे. परंतु चौकशीत खडसेंची साक्ष होऊन गेली, त्यामुळे आता या साक्षीदाराचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या घोटाळ्यातील दोषींवर निश्चितच कारवाई होईल असंही राम शिंदेंनी म्हटलं आहे.
नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?
खडसे यांचा दुपारी दोन वाजता प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मग, तो दुपारी चारपर्यंत का लांबला, हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचं, हे ठरलं नाही. तुमचे समाधान होईल असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. याचबरोबर, "आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होते आणि कॅडबरीनेही समाधान होते. त्यामुळे आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असे म्हणतात, हे पाहावं लागेल असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.
चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला
भाजपाने मला काहीही फुकट दिलेलं नाही. यासाठी ४० वर्षांचे माझे आयुष्य भाजपाला दिले आहे. माझ्या मनगटाच्या जोरावर मिळविले आहे. चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपामध्ये आला आहात. तुम्हाला सर्व फुकट मिळाले आहे अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.