उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसणार; 41 जागा घटणार- सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 07:22 PM2019-04-07T19:22:41+5:302019-04-07T20:02:06+5:30
सपा-बसपाला अच्छे दिन येण्याची शक्यता
नवी दिल्ली: समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा मोठा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील 41 जागा कमी होऊ शकतात, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशातील तब्बल 73 जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा 32 वर येतील, असा अंदाज आहे. तर सपा-बसपा आघाडीला 44 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या जागा 2 वरुन 4 जातील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या दणदणीत विजयात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. मात्र यंदा उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसू शकतो. भाजपा आणि मित्र पक्षांच्या जागा 73 वरुन थेट 32 वर येऊ शकतात. सपा-बसपाच्या आघाडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. सपा-बसपा 2014 मध्ये स्वतंत्र लढेल. त्यावेळी समाजवादी पार्टीला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर मायावतींच्या बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र यंदा या दोघांच्या आघाडीला 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी काँग्रेसनं प्रियंका गांधींकडे सोपवली आहे. त्यांच्याकडून सध्या विविध भागांचे दौरेदेखील सुरू आहेत. मात्र याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत नाही. काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील जागा 2 वरुन 4 वर जातील, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत.