नवी मुंबईत भाजपाला मेगागळती; आतापर्यंत ११ माजी नगरसेवकांनी सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 07:11 IST2021-01-24T00:37:35+5:302021-01-24T07:11:00+5:30
रामआशिष यादव यांचा सेनेत प्रवेश, भाजपाची झोपडपट्टी परिसरात पकड ढिली

नवी मुंबईत भाजपाला मेगागळती; आतापर्यंत ११ माजी नगरसेवकांनी सोडली साथ
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे यादव नगरमधील माजी नगरसेवक रामआशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत पक्षाच्या ११ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले.
दिघा परिसरातील यादव नगरमध्ये एकहाती वर्चस्व असलेले रामआशिष यादव हे पालिकेच्या स्थापनेपासून आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षांतरासाठी दबाव येत असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही भाजप नेत्यांनी केली होती. अखेर शनिवारी यादव यांनी ठाण्यात नरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार राजन विचारे, नगरसेवक एम. के. मढवी, मनोज हळदणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकांची चाहूल लागल्यापासून भाजपमधील अनेक नगरसेवक शिवसेना व इतर पक्षांत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत ११ पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले असून, गळती थांबविण्याचे आव्हान भाजपसमोर उभे राहिले आहे.