लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला
By कुणाल गवाणकर | Published: November 3, 2020 03:09 PM2020-11-03T15:09:58+5:302020-11-03T15:17:01+5:30
मेट्रो कारशेडवरून पुन्हा वातावरण तापलं; केंद्र वि. राज्य सरकार आमनेसामने
मुंबई: मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. ठाकरे सरकारनं आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे. यावरून आता भाजपनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना
प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची नवी पद्धत असल्याचा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच आम्ही त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित केली होती. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्रामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचं आम्ही म्हटलं होतं. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न आम्ही त्यावेळी विचारला होता. केंद्रानं पाठवलेल्या पत्रामुळे आमची शंका रास्त होती हे स्पष्ट झालं आहे, असं शेलार म्हणाले.
तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती... विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2020
मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. pic.twitter.com/Q9RLtedO13
उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव त्यांच्याच 'एक्सपर्ट कमिटी'नं फेटाळला होता; फडणवीसांची 'पुराव्यां'सह पोलखोल
ठाकरे सरकारच्या अहंकाराचा सामना मुंबईतील जनतेला करावा लागत असल्याचं शेलार यांनी म्हटलं. प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची पद्धत आहे. आधी मेट्रो कारशेड प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. दिरंगाई करण्याचे प्रयत्न केले. आता आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांती पूर्तता न करता प्रकल्प अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करून त्यांना भटकवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
कारशेडवरून राज्य वि. केंद्र सामना
कांजूरमार्गमधील १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालं आहे. यावरून डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरात केडरचे अधिकारी असलेले गुरुप्रसाद मोहापात्रा डीपीआयआयटी विभागाचे प्रमुख आहेत. 'जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं मोठं नुकसान झालं आहे. भारत सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मी विनंती करतो,' असं मोहापात्रांनी पत्रात म्हटलं आहे.
केंद्रानं कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर दावा सांगितला असताना राज्य सरकारनंदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी 'मुंबई मिरर'ला दिली. 'केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे,' असं ठाकरेंनी सांगितलं. पण यावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
राज्य सरकार या प्रकरणात कायदेशीर लढा देण्यास सज्ज असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. 'केंद्राकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो, हे आम्हाला अपेक्षित होतं. त्यामुळेच आम्ही जागेची संपूर्ण माहिती घेतली. सर्व कागदपत्रांची पूर्ततादेखील करण्यात आली. कांजूरमार्गमधील जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. ती जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याआधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आम्ही डीपीआयआयटीच्या पत्राला उत्तर देऊ,' अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.