"पोलीस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते,’’ ठाकरे सरकारच्या त्या निर्णयावरून भाजपाची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:00 PM2021-05-13T22:00:13+5:302021-05-13T22:05:31+5:30
Maharashtra Politics News: भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्ष असलेला भाजपा कमालीचा आक्रमक झालेला आहे. दरम्यान, कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या अजून एका निर्णयावर आता भाजपाकडून खरमरीत टीका करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
रमजान ईदनिमित्त ईदीसाठी पोलीस दूध, ड्रायफ्रूट्स आणि किराणा साहित्य घरपोच करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले होते. दरम्यान, या वृत्तावरून अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, पोलिसांमार्फत खंडणी गोळा करून झाली आता पोलीस होम डिलिव्हरी करणार आहेत. ईदीसाठी घरपोच दूध, ड्रायफ्रुट आणि किराणा माल देणार. पोलिस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते, असा टोला भातखळकर यांनी लगावला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या निर्णय़ाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार विरोध केला होता. तसेच सोशल मीडियावरूनही टीका झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, असे म्हणत जवळपास 6 कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.