"हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार! शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा...’’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:26 PM2021-03-12T13:26:16+5:302021-03-12T13:27:15+5:30
Sharjil Usmani : शरजिल उस्मानी (Sharjil Usmani) हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.
मुंबई - एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी या वक्त्याने हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच उस्मानी याच्यावर कारवाईसाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, शरजिल उस्मानी (Sharjil Usmani) हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, असा टोला भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on Issue of Sharjil Usmani )
शरजिल उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करताना केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2021
दरम्यान, एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल पुण्यात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, याठी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी (२३) याने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एल्गार परिषदेतील भाषण आक्षेपार्ह नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपल्यावर नोंदविलेला गुन्हा तथ्यहीन आहे. आपल्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. भाषणात मी सद्यस्थितीतील समाजरचना आणि समस्या याबाबत बोललो आहे आणि या समस्येवर उपायही सांगितला आहे. केवळ लोकांना समस्या समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले, असेही उस्मानीने याचिकेत नमूद केले होते.