“जिनं बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय?”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 07:21 AM2020-09-07T07:21:33+5:302020-09-07T07:26:49+5:30

भाजपा आमदार अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticized Shiv Sena Sanjay Raut over Kangana Ranaut Statement | “जिनं बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय?”

“जिनं बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय?”

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना कंगना राणौतनं उघड आव्हान दिलंयदाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायतशिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजपा आमदाराचा प्रहार

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत असताना यात भाजपा आमदाराने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगना राणौतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने शिवसेनेने तिच्याविरोधात रान उठवले. त्याला कंगनानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र कंगनानं महाराष्ट्राला शहाणपण शिकवू नये असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सुनावलं होतं. एकंदर कंगना प्रकरण तापत असल्याने भाजपाने यु-टर्न घेतला.

कंगना झाशीची राणी आहे, ती शिवसेनेच्या धमकीला घाबरणारी नाही असं विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केले होते. ते विधान त्यांचे वैयक्तिक आहे असं भाजपानं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी कंगनाच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना कंगना राणौतनं उघड आव्हान दिलंय. जिने बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत अशा शब्दात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

तर माझी ताकद काय आहे, हे १०५ निवडून आल्यानंतर विरोधात बसलेत त्यांना विचारा असं राऊत म्हणाले होते. त्यावर विश्वासघाताने १०५ संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले हे खरे. सत्ता हाती आहे, परंतु धमक नसल्याने मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नाही त्याचे काय? घरात कडी लावून बसायला सत्ता हस्तगत केली होती काय? असा सवालही आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान

"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.

कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा

कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.

कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.

अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

'आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताने कंगना राणौत हिची पाठराखण केली आहे.

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticized Shiv Sena Sanjay Raut over Kangana Ranaut Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.