भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज; “घ्या निवडणुका, MVA ला बहुमत मिळालं तर...”
By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 01:17 PM2021-01-19T13:17:25+5:302021-01-19T13:20:17+5:30
निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे.
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी स्पष्ट लागले, या निवडणुकीत अनेकांना धक्के बसले. परंतु निकालावरून अद्यापही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजपात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपानेच जिंकल्याचा दावा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत, तर महाविकास आघाडीला जनतेने साथ दिली आहे, त्यामुळे जनतेचा सरकारला कौल नाही असं म्हणणाऱ्यांच्या घरावरील कौल जनतेने काढून घेतली आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला होता.
यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाली असा शिवसेनेचा दावा असेल तर घ्या निवडणुका. MVA(महाविकास आघाडी) ला बहुमत मिळाले तर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत? असं खुलं चॅलेंज त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.
भाजपा'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही
निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाऊनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही" राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपाचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे असं त्यांनी सांगितले.
बिनविरोध मिळालेल्या ग्रा. पंचायती
निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना ५२० ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.