'कार्यकारी' उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात; भाजपाचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:03 PM2020-09-04T13:03:42+5:302020-09-04T13:10:49+5:30
पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच देशातील सगळेच मुख्यमंत्री घरातूनच काम करत आहेत. कारण परिस्थितीच तशी आहे असं संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावलं होतं. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई – कोरोना संकट काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत असा आरोप विरोधकांकडून सरकारवर केला जात होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत सारखीच आहे असं सांगत भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. यावरुन आता भाजपानेही शिवसेनेला टार्गेट केले आहे.
याबाबत आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना काढला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच देशातील सगळेच मुख्यमंत्री घरातूनच काम करत आहेत. कारण परिस्थितीच तशी आहे. मुख्यमंत्री बाहेर पडल्यावर त्यांच्याबरोबर अधिकारी बाहेर पडतात. लोकांची गर्दी होते आणि सध्याच्या परिस्थिती गर्दी होणं संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. मंत्रिमंडळ राज्यात फिरतं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू. प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा त्याच वेळात घरात बसून अनेक जिल्ह्यांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणं शक्य आहे. यालाच डिजिटल इंडिया म्हणतात, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्क फ्रॉम होम'चं समर्थन केलं होतं.
मुख्यमंत्री १५ तास काम करतात- मंत्री बाळासाहेब थोरात
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. आम्ही तिथं पूरस्थितीच्या ठिकाणी जाणं योग्य नसतं. प्रशासन काम करत आहे, मुख्यमंत्रीही दररोज १५ तास काम करतात. सर्वच स्थितीवर ते काम करत असून परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन आढावा घेतात, असेही थोरात यांनी म्हटलं होतं.
विरोधी पक्षाची टीका
कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत. काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली होती.