“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 04:17 PM2020-09-26T16:17:34+5:302020-09-26T16:21:09+5:30

या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे.

BJP MLA Atul Bhatkhalkar Target Shiv Sena Over corporators advertise medicine on social media | “शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

Next
ठळक मुद्देकोरोनाबाबत शिवसेना नगरसेवकांनी लावलेल्या पोस्टर्सवरुन वाद सरकारने या नगरसेवकांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागणारभाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र लिहून केली कारवाईची मागणी

मुंबई – माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत शिवसेना नगरसेवकांनी लावलेल्या पोस्टर्सवरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्समध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास कोणती औषधे घ्यावीत याची जाहिरात करण्यात आली आहे. यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. शिवसेना नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता कंपाऊंडरकडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माधुरी नाईक, संजना घाडी, सुजाता पाटेकर या नगरसेवकांनी डॉक्टरांचा कोणताही सल्ला न घेता लक्षणानुसार कोरोनावरील औषधे कधी व कशी घ्यावीत याची जाहिरातबाजी करुन सोशल मीडियात प्रसार केल्याचं उघड झालं. शिवसेना नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नगरेसवकांनी कंपाऊंडरकडून औषधे घेण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करु नका असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता शिवसेनेला लगावला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरात अशाप्रकारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असून जर यात नमूद औषधे घेतली व त्यातून काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असेल? त्यामुळे अशा प्रकारे जाहिरात करणे अत्यंत चुकीचे असून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत गुन्हा असल्याने या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे.

दरम्यान, सरकारने या नगरसेवकांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती भयावह होत असताना त्यावर उपाय शोधण्याचा सोडून व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचं सोडून शिवसेना नको ती जाहिरातबाजी करण्यात मग्न असल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

इंडियन मेडिकल असोसिएशननेही केली कारवाईची मागणी

शासनाच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेअंतर्गत शिवसेनेच्या एका पोस्टरमध्ये नागरिकांना काही औषधांची नावे सुचवण्यात आली आहेत. भारताच्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा- १९४० आणि १९४५ यांचे हे गंभीर उल्लंघन आहे, याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने लक्ष वेधले आहे. हे पोस्टर त्वरित मागे घेऊन प्रतिबंधात्मक बाबींवर जोर द्यावा. औषधाचा भाग प्रमाणित डॉक्टरांना हाताळू दयावा, अशी मागणी आयएमएतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.

काय आहे आयएमएचे म्हणणे?

  • पोस्टरमध्ये लिहिलेल्या औषधांचे डोस योग्य नाहीत.
  • या पोस्टरमध्ये दर्शविलेले डेक्झामेथाझोन हे एक स्टिरॉइड आहे आणि डॉक्टरांच्याच सल्ल्याने त्याचा वापर करावा लागतो. पोस्टरमध्ये त्याची वेळ संध्याकाळी दिली गेली आहे जी चुकीची आहे.
  • मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, जीईआरडी आणि जठराची सूज असलेल्या व्यक्तींनी ही स्टिरॉइड्स घ्यायची नसतात. त्याचे अतिशय गंभीर परिणाम उद्भवू शकतात.
  • या पोस्टरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा 'लोगो दाखवला आहे. अशा सार्वत्रिक मोहिमेत आणि चुकीच्या निर्देशामध्ये परवानगीविना लोगो वापरणे आक्षेपार्ह ठरू शकते.

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar Target Shiv Sena Over corporators advertise medicine on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.