“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”; भाजपा आमदाराचा टोला
By प्रविण मरगळे | Published: December 15, 2020 01:22 PM2020-12-15T13:22:27+5:302020-12-15T13:26:03+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले अशी टीका शिवसेनेने केली होती.
मुंबई – महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, यावरून सामना अग्रलेखात शिवसेनेने फडणवीस आणि भाजपाचा समाचार घेतला, त्यावरून आता शिवसेना-भाजपा यांच्यात कलगीतुरा सुरु झाला आहे. सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटलंय की, सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये, आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा असं त्यांनी म्हटलं आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत. हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच असं शिवसेनेने म्हटलं होतं.