“दाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:46 AM2020-09-09T08:46:17+5:302020-09-09T08:48:00+5:30
पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता राजकीय वळण लागलं आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाचा खरपूस समाचार घेतल्यानंतर भाजपानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता.
मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 9, 2020
मुख्यमंत्र्यांच्या या विधानवरुनही भाजपाने उत्तर देत पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंग राजपूतचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
सामना अग्रलेखातून शिवसेनेची भाजपावर टीका
राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, असा टोला शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून भाजपाला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून भाजपाचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
कंगनाच्या निषेधाचा ठराव; विरोधी पक्षनेत्याचा सरकारला टोला
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधाचा ठराव विधानसभेत मांडला गेला. आपण देखील कंगनाच्या विधानाचे समर्थन करत नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसार माध्यमे जर विरोधात बोलत असतील, मुख्यमंत्र्यांचे उल्लेख चुकीच्या पद्धतीने करत असतील, तर त्याचे समर्थन कदापि केले जाणार नाही. मात्र छगन भुजबळ ज्या पोटतिडकीने उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी बोलले त्याच पोटतिडकीने त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उल्लेख कसे केले जातात हे देखील तपासून पहावे. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गळे काढणारे आज गप्प आहेत? कोणाचाही एकेरी उल्लेख चुकीचा आहे. मात्र हाच निकष सर्व माध्यमांना लागू असला पाहिजे असे सांगून फडणवीस म्हणाले, कंगना रणौतच्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा नक्कीच अपमान झाला आहे. पण या सभागृहाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.