उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका
By मोरेश्वर येरम | Published: December 1, 2020 05:35 PM2020-12-01T17:35:25+5:302020-12-01T17:37:21+5:30
उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
मुंबई
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन केलं आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
"पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रणरागिणी म्हणून ज्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या तसेच ज्या घरादाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवय्या कार्यकर्त्या म्हणून काम केलं त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे'', असं प्रवीण दरेकर म्हणाले.
उर्मिला मातोंडकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना महिला आघाडी मजबूत होईल!अशा प्रकारचं वक्तव्य करण म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलनं करणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणींच्या कामावर पाणी फेरल्यासारखं आहे. @rautsanjay61@Dev_Fadnavis@ChDadaPatil@bjp4mumbai@BJP4Maharashtra@TV9Marathipic.twitter.com/rVZttCItgC
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 1, 2020
"शिवसेना पक्षाची मूळ विचारधारा बदलली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केलं. आज ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला गेला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरत आहे", असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.