“मुख्यमंत्री ६ महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”
By प्रविण मरगळे | Published: October 19, 2020 10:28 AM2020-10-19T10:28:31+5:302020-10-19T10:31:46+5:30
BJP Mla Gopichand Padalkar Target CM Uddhav Thackeray News: केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारने १ योजना दाखवावी असं आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.
बारामती – राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत, मात्र या दौऱ्यावरून विरोधी पक्ष भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने केली पण राज्य सरकारने काय केले हे सांगावे, अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल पण राज्याने केंद्राकडे किती नुकसान झालं याचं आढावा तरी पाठवला पाहिजे, तहसिलदार पोहचत नाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा, केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारने १ योजना दाखवावी असं आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही, प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेत, कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहचले आहेत असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाद निर्माण झाला आहे, सांगवी खुर्द येथील गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी गावात येऊन पाहणी करावी अशी आग्रही मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री बोरी नदीच्या पुलावरुन पाहणी करणार असल्याचं प्रशासन म्हणत आहेत, पुलावरुन पडझड झालेली घरे आणि नुकसान कसं दिसणार? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावात जाण्यासाठी चिखल असल्याने त्यांना पोहचता येणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे दौऱ्याच्या वेळी हा वाद निर्माण झाला आहे.
शरद पवारांनीही केली अतिवृष्टीची पाहणी
अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं,हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी दिली आहे.