“शिवप्रसाद काय असतो तो वैभव नाईकांना विचारावं; पाहिजे असेल तर सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 02:44 PM2021-06-19T14:44:55+5:302021-06-19T14:46:55+5:30
या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
मुंबई – राम मंदिराच्या मुद्द्यावरून अलीकडेच शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दादर येथे राडा झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा समोरासमोर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली होती. मात्र पेट्रोल पंपावर भाजपा कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात झटापट झाली.
या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले की, शिव प्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकना विचारावा. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये, टेस्ट आवडेल नक्की!! असा चिमटा त्यांनी शिवसेनेला लगावला. दादर येथील घटनेनंतर संजय राऊतांनी भाजपा कार्यकर्त्यांना शिवप्रसाद दिल्याचं म्हटलं होतं. जर थांबला नाही तर शिवभोजन थाळी देऊ असा इशारा दिला होता. त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.
शिव प्रसाद काय असतो ..
— nitesh rane (@NiteshNRane) June 19, 2021
ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..
पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे ..
टेस्ट आवडेल नक्की!! @rautsanjay61
सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लीटर आणि भाजपा कार्यकर्त्यांना १ लीटर पेट्रोल मोफत देण्याचा कार्यक्रम आमदार वैभव नाईक यांनी केला होता. विशेष म्हणजे हे पेट्रोल पंप भाजपा खासदार नारायण राणे यांच्या मालकीचं होतं. मात्र यावेळी भाजपा कार्यकर्ते पेट्रोल पंपावर जमल्याने तिथे आमदार नाईक आणि कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत पोलिसांनाही फटका बसला. भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना भर रस्त्यावर वर्दी पकडत धक्काबुक्की करण्याऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण काही काळ तंग झाले होते.
सिंधुदुर्ग: कुडाळात भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने; आमदार वैभव नाईक यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी, काही काळ वातावरण तणावपूर्ण https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/bEPej7M6We
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2021
वैभव नाईकांसमोर पेच...
वैभव नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे. परंतु वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार आहेत. जो नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. तेथून पहिल्यावेळी ते नारायण राणेंना हरवून निवडून आले होते. नाईकांचा पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत. तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे आमदार पूत्र नितेश राणेंच्या मतदारसंघात आहे. मालवण शहरात एकच पेट्रोल पंप आहे, तो देखील राणेंच्याच मालकीचा आहे. यामुळे आता वैभव नाईकांना त्यांचे डावपेच फोल जाऊ द्यायचे नसतील तर कुडाळ शहराबाहेरील पेट्रोल पंपांचा आधार घ्यावा लागणार आहे. परंतू हे पेट्रोल पंप लांब असल्याने त्यांचा प्रयत्न तेवढा यशस्वी ठरला नाही.