प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा भाजप आमदाराचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 05:18 AM2021-03-03T05:18:31+5:302021-03-03T05:19:23+5:30

कोरोनामुळे प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांना बसविले आहे. धुर्वे हे तेथे बसून बोलत असताना त्यांच्या  भावना अनावर झाल्या आणि ते कठड्याकडे झुकले, तेव्हा भाजपच्या दोन-तीन आमदारांनी त्यांना आवरले.

BJP MLA tries to jump out of the audience gallery! | प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा भाजप आमदाराचा प्रयत्न!

प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा भाजप आमदाराचा प्रयत्न!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आमदार गॅलरीतून उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने विधानसभेत एकच गोंधळ उडाला. हा तर सरळ आत्महत्येचा प्रयत्न असून हा गुन्हा आहे, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी केला तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी आमदारांच्या या कृतीचे विरोधी पक्ष समर्थन करतो काय, असा सवाल केला. गदारोळातच प्रश्नोत्तरे संपले.


धुर्वे यांनी आर्णी, जि. यवतमाळ येथील नगर परिषदेतील घोटाळ्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेनेच्या नगरसेवकाने दीड वर्षांपूर्वी तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी नीलेश राठोड यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. धुर्वे यांनी केली. 
कोरोनामुळे प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांना बसविले आहे. धुर्वे हे तेथे बसून बोलत असताना त्यांच्या  भावना अनावर झाल्या आणि ते कठड्याकडे झुकले, तेव्हा भाजपच्या दोन-तीन आमदारांनी त्यांना आवरले. आठ दिवसांत चौकशी केली जाईल व दोषींना निलंबित केले जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

परब यांच्या टिप्पणीवरून  विरोधकांचा सभात्याग
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी केलेल्या टिपण्णीवरून मंगळवारी विधानपरिषदेत जोरदार गदारोळ माजला. परब यांनी विरोधी पक्षनेता आणि परिषद सभागृहाचा अपमान केला आहे. माफी मागेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.


विरोधी पक्षनेते दरेकर यांचे भाषण सुरू असताना परब यांनी मध्ये उभे राहून टोमणा मारला. विधानसभेत याविषयावरील भाषणे मी ऎकली. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणात तेच मुद्दे आहेत. खालचेचे भाषण ते वाचून दाखवत आहे. फक्त त्यातली काही पाने सापडत नसल्याने त्यांची बहुदा लिंक तुटत आहे. त्यामुळे कोणीतरी खालच्या सभागृहातील भाषण आणून द्यावे, असा शेरा मंत्री परब यांनी मारला. त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

विरोधी पक्षनेत्याने काय बोलायचे, कोणते मुद्दे मांडायचे याचा निर्णय परब घेणार का, असा सवाल करत सत्तेचा इतका अहंकार आला का, असे दरेकर म्हणाले. परब यांनी मात्र अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता. दरेकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांना दुखावण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा केला. मात्र, दिलगिरी व्यक्त केली नाही.

Web Title: BJP MLA tries to jump out of the audience gallery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.