“सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं वाटत नाही”; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 08:57 AM2021-01-04T08:57:35+5:302021-01-04T09:00:04+5:30
West Bengal Assembly Election: मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं.
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या भाजपामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. यात पश्चिम बंगालच्या बैरकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे.
सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या होवो हे वाटत नाही
खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहायला हवं आणि केंद्रीय सुरक्षा कवच मागायला हवं, पश्चिम बंगालच्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं आम्हाला वाटत नाही.
काय आहे प्रकरण?
मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं. या विधानानंतर पश्चिम बंगालमधील राजकारण पेटलं होतं, भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी हिंसक चकमकी घडत असल्याच्या घटना होतात, यात दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. (West Bengal Assembly Election)
बंगालच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही साधला निशाणा
पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या विधानावर पलटवार केला आहे. घोष म्हणाले की, राज्यातील ममता सरकार पश्चिम बंगालच्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच अशाप्रकारे काहीही विधानं करत आहेत. ममता बॅनर्जी म्हणतात, काही लोक माझी हत्या करण्याचं षडयंत्र रचत आहेत, पण असा गुन्हा कोणी का करेल? पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. ज्यामुळे लोकांचा सहानुभूती ममता बॅनर्जी यांना मिळेल असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात
विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करत बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल करतंय, भाजपाने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते.