“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 03:27 PM2020-09-16T15:27:23+5:302020-09-16T15:35:33+5:30

खासदार संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

BJP MP Chhatrapati Sambhaji Raje Warning to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation | “आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

Next
ठळक मुद्देनोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहेजिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे.मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी

मुंबई - मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावने सुरू केले आहे असं सांगत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

संभाजीराजेंनी या पत्रात म्हटलं आहे की, नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करून आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेंव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतः साठीच उभारण्याची वेळ आली आहे असं त्यांनी सांगितले.  

देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे. तसेच न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्याउपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे असा इशारा देत त्यामुळे आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली आहे.

छत्रपती उदयनराजेंनी आंदोलनाचं नेतृत्व करावं – विनायक मेटे

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही

शिवसेना हा आरक्षणाला विरोध असणारा पक्ष असून, या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाणीवपूर्वक विरोध आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी व थोरात यांची काँग्रेस हे प्रस्थापित लोकांचे पक्ष आहेत. यांना विस्थापित मुलांना प्रवाहात येऊ द्यायचे नाही. गरीब मराठा युवकांची वाताहत या तीन पक्षांच्या सरकारमुळे झाल्याचे विनायक मेटे म्हणाले. मुख्यमंत्री व अशोक चव्हाणांकडून पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील कधीही मराठा आरक्षणावर बोलत नाहीत. समाज त्यांना मानतो. मात्र, समाजासाठी ते बोलायला देखील तयार नाहीत. राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर  उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मेटेंनी सांगितले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट

बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार

कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी

ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

Web Title: BJP MP Chhatrapati Sambhaji Raje Warning to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.