इतकी जमीन खरेदी कशासाठी? उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?- किरीट सोमय्या
By कुणाल गवाणकर | Published: November 12, 2020 03:45 PM2020-11-12T15:45:15+5:302020-11-12T15:46:20+5:30
पुन्हा पत्रकार परिषद घेत सोमय्यांकडून ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती
मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा केला आहे. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का?, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.
नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबं कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असतं. लोकांना तसं वाटतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, असं आवाहन सोमय्या यांनी केलं. उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं, असंही सोमय्या पुढे म्हणाले.
ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीची चौकशी करा; भाजपची मागणी
वायकर आणि ठाकरे कुटुंबानं रायगडमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत असे किती व्यवहार केले आहेत? त्यांचे संयुक्तपणे किती व्यवसाय आहेत?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले. ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना असताना फडणवीस सरकार असताना त्याबद्दलच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांकडून सोमय्यांनी विचारण्यात आला. त्यावर स्थानिक लोक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासुरवाडी रायगडमध्ये आहे. तिथे गेलो असताना व्यवहाराची माहिती मला मिळाली, असं उत्तर सोमय्यांनी दिलं.
ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार •गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे नव ठिकाणी दिसत आहेत. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/w5PzrNQI96
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
वायकर यांच्याकडून सोमय्यांना प्रत्युत्तर
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले. 'रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.