UP मध्ये ओवेसींची एन्ट्री; साक्षी महाराज म्हणाले, "आधी बिहारमध्ये मदत केली आता इकडे करतील"
By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 11:32 AM2021-01-14T11:32:48+5:302021-01-14T11:34:17+5:30
यापूर्वीही अनेकदा विरोधकांकडून ओवेसी यांनी भाजपाला मदत केल्याचा करण्यात आला होता आरोप
काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षानं उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर आता ओवेसींनी आपला मोर्चा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालकडे वळवला आहे. ओवेसी यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. तसंच यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. यादरम्यान बुधवारी भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी एक मोठं वक्तव्य केलं. "ओवेसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल," असं ते म्हणाले.
बुधवारी दिल्लीला जाण्यापूर्वी साक्षी महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ओवेसी यांच्या आझमगढ-जौनपूर दौऱ्याबद्दल सवाल करण्यात आला. तसंच त्यांना नागरिकांकडून मिळणाऱ्या समर्थनाबद्दलही विचारण्यात आलं. "देव त्यांना ताकद देवो, त्यांची साथ देवो, त्यांनी बिहारमध्ये आम्हाला मदत केली होती. आता ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मदत करतील," असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी या प्रश्नांना उत्तर देताना केलं.
"आम्ही मुस्लिमांचाही विश्वास मिळवत आहोत. गेल्या ६५ वर्षांपासून भारतातील मुस्लिमांना तुष्टीकरणाच्या नावाखाली घाबरवण्यात आलं. परंतु आज मुस्लिमांना आपलं हित जाणणारा पक्ष हा भाजपा हे समजून आलं आहे. मोठ्या संख्येने मुस्लीम वर्गही भाजपाशी जोडला जात आहे." असंही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षांनी असदुद्दीन ओवैसी हे भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला होता. बिहारच्या निवडणुकांमध्येही एमआयएमला पाच जागांवर विजय मिळाला होता. तसंच अनेक ठिकाणी एमआयएममुळे आघाडीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. परंतु आता ओवेसी यांनी आपला पक्ष बिहार आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्येही उतरणार असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी आहे. या ठिकाणी पुढील वर्षी निवडणुका पार पडणार आहेत.