Video: खासदार उदयनराजेंची बाईक सवारी सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला
By प्रविण मरगळे | Published: October 23, 2020 10:35 AM2020-10-23T10:35:07+5:302020-10-23T10:36:58+5:30
MP Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बाईक रायडिंगची आवड आहे. उदयनराजे समर्थकही एखादी गाडी घेतली तर हमखास उदयनराजेंना दाखवण्यासाठी सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे आणतात
सातारा – छत्रपती घराण्याचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्या राहणीमानाची चर्चा अनेकदा होते. उदयनराजेंची विधानं आणि स्टाईल यामुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या निवडीमुळे उदयनराजे यांचा चाहता वर्ग मोठा आहे. फक्त साताऱ्यात नाही तर राज्यभरात उदयनराजेंच्या स्टाईलने अनेकांना वेड लावलं आहे. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता म्हणूनही उदयनराजेंची ख्याती आहे.
सध्या उदयनराजेंच्या या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली, उदयनराजेंना बाईक रायडिंगची आवड आहे. उदयनराजे समर्थकही एखादी गाडी घेतली तर हमखास उदयनराजेंना दाखवण्यासाठी सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे आणतात. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेही मग कार्यकर्त्यांच्या बाईकचा फेरफटका मारतात. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड झाला आहे. यात उदयनराजे बाईक चालवताना दिसत आहेत.
खासदार उदयनराजेंनी घेतला बाईक चालवण्याचा आनंद, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल @Chh_Udayanrajepic.twitter.com/LIr0EgEkeZ
— Lokmat (@MiLOKMAT) October 23, 2020
गुरुवारी एका कार्यकर्त्यांना घेतलेली नवीन बाईक उदयनराजेंना दाखवण्यासाठी आणली. मग काय राजेंनीही कार्यकर्त्यांकडून बाईकचा ताबा घेतला आणि सुरु केली. जलमंदिर पॅलेस परिसरात उदयनराजेंनी बाईकची अक्षरश: सुसाट वेगाने बाईक चालवली तेव्हा कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. उदयनराजेंचा हा अंदाज कॅमेऱ्यात कैद करणाऱ्यांनी गर्दी केली. कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात उदयनराजेंच्या बाईक सवारीचा आनंद घेत होते. सध्या उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
उदयनराजे हे त्यांच्या हटके स्टाईलमुळे फेमस आहेत, कार्यकर्त्यांसाठी टपरीवर चहा पिणे, स्वत:च्या विरोधात असलेल्या मोर्चात सहभागी होणे, मनाला पटेल तेच रोखठोक आणि बिनधास्त बोलणे, समोर कोणीही असो त्याची पर्वा करता उदयनराजे त्यांचे म्हणणं मांडतात. मराठा आरक्षणाच्या वादात त्यांनी थेट सर्वच आरक्षण रद्द करा अशाप्रकारे रोखठोक भूमिका घेतली, त्यावरुन वाद निर्माण झाला होता. प्रकाश आंबेडकरांनी एक राजा बिनडोक म्हणून उदयनराजेंवर बोचरी टीका केली होती, त्यामुळे राजे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा अवघ्या ३ महिन्यात राजीनामा देत उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला असला तरी त्यांची क्रेझ आजही कायम आहे. अलीकडेच भाजपाने उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी दिली आहे.