"मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना?", नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:07 PM2021-04-05T16:07:58+5:302021-04-05T16:12:31+5:30
Nitesh Rane : सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट निलंबित API सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. (bjp nitesh rane slams uddhav thackeray on anil deshmukh resigned)
यावरून नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच दिसते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? असा सवाल करत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे, असं दिसतंय..ज्यांना परमवीर सिंग यांनी 100 कोटींबद्दल माहिती दिली, त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ?? असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय..
— nitesh rane (@NiteshNRane) April 5, 2021
ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ?
मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते.
याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचे पत्र, जसेच्या तसे....
प्रति
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आदरणीय महोदय
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती
आपला
अनिल देशमुख