'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस
By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 05:09 PM2021-01-18T17:09:28+5:302021-01-18T17:10:11+5:30
भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यासोबत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका यावेळी केली. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
"राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाउनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही", असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही
"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोकणात अभूतपूर्व यश
ग्राम पंचायत निवडणूक निकाल कोकणात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचाही फडणवीस यांनी आवर्जुन उल्लेख केला. "राणे यांच्यामुळे कोकणात आज भाजपला मोठं यश मिळालं आहे. तिथं स्थानिक पातळीवर शिवसेनेविरोधात रोष निर्माण झाला आहे. गावाचा विकास कोण करेल हे पाहून लोकांनी मतदान केलं आहे", असं फडणवीस म्हणाले.
नामांतरावर केवळ 'टाइमपास'
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "औरंगाबादचं नामांतर करण्याची खरंतर या सरकारची इच्छाच नाहीय. शिवसेना आणि काँग्रेस केवळ पत्राचा खेळ खेळत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ आपल्या मतदारांना खूष करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नामांतरावरुन हे सरकार केवळ टाइमपास करत आहे", असं फडणवीस म्हणाले.