मिशन बंगालसाठी आता भाजपची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:30 AM2020-11-19T01:30:01+5:302020-11-19T01:30:39+5:30
सुनील देवधर, तावडेंकडे महत्त्वाची जबाबदारी. भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारच्या विजयानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन बंगालसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपने पश्चिम बंगालचे पाच विभाग तयार केले असून प्रत्येकाची जबाबदारी एका नेत्याकडे निश्चित केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत.
भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी पाहतील. विनोद सोनकर यांच्याकडे बर्दमान तर हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीचा अहवाल तयार करून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हेच पश्चिम बंगाल राज्याचे प्रभारी असतील.
गेल्या निवडणुकीत टीएमसीला सर्वाधिक २११ काँग्रेसला ४०, डाव्या पक्षांना २६ तर भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी राज्यात १४८ जागा आवश्यक असतात.
मालवीय सहप्रभारी
आयटी सेलचे अमित मालवीय यांना पश्चिम बंगालचे सह प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरकार असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत.