“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:52 PM2021-08-24T16:52:09+5:302021-08-24T16:52:54+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना संगमेश्वर येथे पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपचे प्रमाद जठार यांनी जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती स्थगित झाल्याचे स्पष्ट केले.
संगमेश्वर: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना संगमेश्वर येथे पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपचे प्रमोद जठार यांनी जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती स्थगित झाल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी संगमेश्वर पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपले होते, अशी प्रतिक्रिया दिली. (bjp pramod jathar reaction after sangameshwar police arrest narayan rane)
जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती थांबलेली आहे. यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही, तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगं या महाराष्ट्रात उभे केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना दिसत आहे.
जनआशीर्वाद यात्रेचे रुपांतर आंदोलनात होईल
नारायण राणेंना पोलिसांनी सोडले नाही, तर भाजप तीव्र आंदोलन करेल. जनआशीर्वाद यात्रेचे रुपांतर आंदोलनात होईल. आजच्या दिवसापुरती जनआशीर्वाद यात्रा स्थगित केली असून, ती सुरूच राहणार आहे. भाजपचे कार्यकर्ते मुंबई-गोवा महामार्ग ठप्प करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री असल्याने काही प्रोटोकॉल आवश्य पाळले पाहिजे. आम्हाला अटक वॉरंट दाखवा, राणे पोलिसांच्या गाडीत बसून अटक व्हायला तयार आहेत. पोलीस सांगतात आम्हांला दोन मिनिटात अटक करायला सांगितली आहे, अशी माहिती प्रमोद जठार यांनी दिली. दुसरीकडे, नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली होती. राणेंची तब्येत ठीक नसल्याची माहिती आता समोर आली आहे. नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना शूगर आहे आणि त्यांचे ब्लडप्रेशर जास्त होते. त्यांची शूगर तपासायची होती पण ती तपासता आलेली नाही. पण त्याचे ब्लडप्रेशर जास्त आढळून आलं आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असे राणेंच्या आरोग्याची तपासणी केलेल्या डॉक्टरांनी म्हटले आहे.