"मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना"; भाजपाचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:10 PM2021-06-23T17:10:29+5:302021-06-23T17:11:57+5:30
BJP Pravin Darekar Slams BMC : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयूमधील एका रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. खबरदारी घेतल्यानंतरही घडलेला हा प्रकार गंभीर आहे. रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. याच दरम्यान भाजपाने मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना" असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे. आज त्या रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. मुंबई महापालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे" असं दरेकरांनी म्हटलं आहे. तसेच "मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, महापौरांना लक्ष द्यायला वेळ मिळेना! इथे सगळेच 'राम भरोसे'. राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या अशा उंदरांचा लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे" असं देखील दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात, उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, आज त्या रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. @mybmc ला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. pic.twitter.com/16dz8qV8gk
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 23, 2021
दरेकर यांनी रूग्णालाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. "डॉक्टरांनी आपल्यापरीने महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी 100 टक्के शरमने मान खाली मुंबईकरांना घालावी लागेल, किंबहुना महापालिकेला अशा प्रकारची भयानक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. असाच प्रकार सायन हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील घडला होता. जर महापालिका कोरोना काळात सर्वोत्तम म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे आणि अशावेळी उंदीर जर एखाद्या आयसीयूमधील रूग्णाचे डोळे कुरतडत असेल, तर यापेक्षा गंभीर दुसरी बाब असू शकत नाही. मनपाच्या नियमांनुसार तिथं सॅनिटायझेशनची आवश्यकता असते, जर व्यवस्थित सॅनिटायझेशन झालेलं असतं, तर तिथं उंदीर येऊ शकला नसता. याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? मग ते संबंधित अधिकारी कुठं आहेत? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे" असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात,महापौरांना @mybmc कडे लक्ष द्यायला वेळ मिळेना!
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 23, 2021
इथे सगळेच 'राम भरोसे'
राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली.
महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या अशा 'उंदरांचा' लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे pic.twitter.com/mHE0HsW52E
"केवळ चौकशी झाली, अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, असा प्रकार होता कामा नये. लोकं आता घाबरले आहेत, सायन हॉस्पिटलला या अगोदर असा प्रकार झालेला असुनही तुम्ही सुधारला नाहीत. आता राजावाडी रूग्णालयात घडला आहे. मी या प्रकाराबद्दल अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे" असं देखील प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. श्रीनिवास यल्लपा या 24 वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि यकृतासंबंधी समस्या होती. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे समोर आले. त्यांनी परिचारिकांना सांगितले. मात्र, त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आयसीयू तळमजल्यावर असल्याने येथे उंदरांचा वावर आहे. प्रथमदर्शनी उंदराने चावा घेतल्याचे दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
"राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक"#BJP#atulbhatkhalkar#shivsena#Congress#RamMandir#Politicshttps://t.co/BBl4URBMngpic.twitter.com/2G3rgZTWDx
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2021