मिशन 2021: भाजपशासित राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या प्रयत्नांत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 09:46 AM2020-11-27T09:46:35+5:302020-11-27T09:47:07+5:30
Anti Love Jihad Law: २०२१ मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बनवणार मुद्दा
नितिन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशनंतर भाजपशासित इतर राज्येही लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा बनवण्याच्या तयारीत आहेत. मध्यप्रदेशने याबाबत कायद्याचा मसुदा तयार केला तर हरयाणा, कर्नाटकमध्येही कायद्याची तयारी सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम व इतर राज्यांत भाजप हा मुद्दा मोठा बनवू शकते.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, लव्ह जिहाद गंभीर प्रश्न आहे. अनेक भगिनी व माता त्याच्या बळी ठरल्या आहेत. हा राज्यांचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी त्याविरोधात कारवाई करायला हवी. काही राज्य सरकारे लव्ह जिहादविरोधात काम करत आहेत व पुढेही लव्ह जिहादविरोधात कारवाई सुरूच राहील.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य करून राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संगतीत आल्यावर लव्ह जिहादवर शिवसेनेची भूमिका नरमली आहे.
याबाबत भाजपच्या एका केंद्रीय पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, हा एक मोठा मुद्दा आहे. भाजप बहिणी, मुलींच्या सन्मान व स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी नेहमी बांधील आहे. भाजपशासित राज्ये किंवा गैर भाजपशासित राज्ये असतील तेथे भगिनी- मुलींना फसवण्यात आल्याचे दिसल्यास निश्चितपणे भाजप त्यांच्या पाठीशी उभा ठाकेल.
नितीश सरकारवरही दबाब
लव्ह जिहादवर कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर दबाब वाढताना दिसतो आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बिहारमध्ये लव्ह जिहादबाबत कायदा बनवावा, असे आव्हान भाजपसमोर ठेवले तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी नितीश कुमार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा बनवावा असे आवाहन केले. पुढील वर्षी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ व केंद्रशासित प्रदेश पुड्डुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातील फक्त आसाममध्ये भाजपा आपले खाते उघडू शकला आहे.