“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:17 PM2021-07-21T14:17:39+5:302021-07-21T14:27:12+5:30
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नवी दिल्ली: दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये सलग दोन दिवस विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही सभागृहांची कार्यवाही अनेकदा स्थगितही करण्यात आली. यातच आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने संसदेत सांगितले गेले. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली असून, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय, असा टोलाही भाजपने लगावला आहे. (bjp sambit patra replied sanjay raut criticism over oxygen shortage death figures)
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संसदेत दिले. यावरून केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला
संजय राऊत यांची माहिती अपुरी
संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात, या शब्दांत संबित पात्रा यांनी पलटवार केला. तसेच महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली होती. यावर राज्य सरकारने उत्तर दिले आहे, असेही पात्रा यांनी नमूद केले.
LIVE: Press Conference by Dr. @sambitswaraj at BJP HQ. https://t.co/gMARhAFo5q
— BJP (@BJP4India) July 21, 2021
दरम्यान, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ऑक्सिजन तुटवडा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप करणे चुकीचे ठरेल. राज्यांकडून कदाचित चूक होऊ शकते, असेही ते म्हणाले होते, याची आठवण पात्रा यांनी यावेळी करून दिली. यावेळी संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस खासदार, नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले.