"भाषणात हिंदुत्व कायम आहेच म्हणायचं आणि निभवायची वेळ आली की…" भाजपाने मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले
By बाळकृष्ण परब | Published: March 4, 2021 10:17 AM2021-03-04T10:17:24+5:302021-03-04T10:18:11+5:30
BJP Criticize Uddhav Thackeray : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. त्यादरम्यान...
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये (BJP) चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आदी भाजपाच्या नेत्यांनी घणाघाती टीका करत सरकारची कोंडी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही (Uddhav Thackeray) या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच शिवसेनेचं हिंदुत्व (Hindutwa) कायम असल्याचाही पुनरुच्चार केला. मात्र आता या मुद्य्यावरून भाजपाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. (BJP Spokesperson Keshav Upadhye Criticize CM Uddhav Thackeray on issue Of Hindutwa )
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत आमचे हिंदुत्व कायम आहेच, म्हणणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष केले आहे. या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व कायम आहेच असं भाषणात म्हणतात. मात्र ते निभावण्याची वेळ आली की, राम मंदिर समर्पण निधीवर टीका करतात. सावरकरांना आदरांजली वाहणे दूर राहिले. सत्तेसाठी सावरकरांवर गलिच्छ आरोप करणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी करतात, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
हिंदुत्व कायम आहेच म्हणायच भाषणात @OfficeofUT पण निभवायची वेळ आली की...
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 4, 2021
◾️राम मंदीर समर्पण निधीवर टीका करायची
◾️सावरकरांना आदरांजली वाहणे दूर सत्तेसाठी सावरकरांवर गलिच्छ आरोप करणाऱ्या कॅाग्रेस सोबत
—२
याबाबत केलेल्या अजून एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणाले की, शिवसेना संभाजीनगर नामकरणाच्या केवळ गप्पा मारतेय. कारण औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध आहे. हिंदू सडा हुवा है म्हणणाऱ्या शरजिला राज्यात मोकळे रान दिले जाते. मात्र शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर केली.
◾️संभाजीनगर नामकरणांच्या नुसत्याच गप्पा कारण नामांतरास कॅाग्रेस राष्ट्रवादीचा विरोध
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 4, 2021
◾️हिंदू सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जीलला मुक्त रान मात्र शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
दरम्यान, काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. बाबरी मशीद पडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले. आता राममंदिरासाठी पैसे गोळा करता? फिरत आहेत. कोरोना काळात चांगले काम केले असताना महाराष्ट्राची बिहारसोबत तुलना का करता? आमच्यावर जरूर टीका करा; पण, महाराष्ट्राची बदनामी करू नका. खोटं बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व, राममंदिर, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा परामर्श घेत ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली.