"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:04 PM2021-02-11T13:04:02+5:302021-02-11T13:24:43+5:30
BJP Sudhir Mungantiwar And Thackeray Government : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावं लागलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला असून भाजपाच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी "राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल" असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे.
कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला अद्याप परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरुन पुन्हा राजभवानात परतावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.
नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!https://t.co/5teq1mPxlS
— Lokmat (@MiLOKMAT) February 11, 2021
नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!
उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, देहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाईनच्या सूत्रांनी दिली आहे.