भाजपामध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:46 AM2019-03-07T05:46:22+5:302019-03-07T05:46:32+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकांत मोदी लाटेत उत्तराखंडमधील सर्व ५ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता.
- विकास चाटी
गेल्या लोकसभा निवडणुकांत मोदी लाटेत उत्तराखंडमधील सर्व ५ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने हे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले. विधानसभेच्या ७१ जागांपैकी ५४ जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेसला ११ जागांवर समाधान मानावे लागले.
साहजिकच विजयाची शक्यता वाढल्याने यंदा लोकसभेसाठी भाजपाकडून प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पण ही गर्दी कदाचित पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यापर्यंत घातक ठरण्याची शक्यता आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र इच्छुकांची भाऊगर्दी हे पक्षातील लोकशाहीचेच निदर्शक असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशात बसपा व समाजवादी पार्टीने आघाडी केली असून, उत्तराखंड व मध्य प्रदेशातही हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत.
भाजपामधील इच्छुकांपैकी अनेक दिग्गजांनी प्रसारमाध्यमांतून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करून पक्षनेतृत्वाला पेचात टाकले आहे. नैनितालचे खासदार भगतसिंग कोशियारी यांनी यंदा निवडणूक लढवणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याजागी भाजपाला मातब्बर उमेदवार शोधावा लागेल. मंत्री यशपाल आर्य, माजी मंत्री आमदार बन्सीधर भगत, तसेच आमदार पुष्करसिंग धामी, राजकुमार ठुकराल, राजेश शुक्ला यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. आर्य हे बाजपूर विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. नैनिताल लोकसभा मतदारसंघातील बराचसा भाग आपल्या विधानसभा मतदारसंघात येत असल्याने आपण सहज विजयी होऊ, असा दावा त्यांनी केला आहे.
राजेश शुक्ला यांनी किच्छा मतदारसंघातून आतापर्यंत दोन वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे नेते हरीश रावत यांना पराभूत करून जायंट किलर ठरल्यामुळे आपल्यालाच तिकीट मिळावे, असा दावा त्यांनी केला आहे. दोन दिग्गजांच्या स्पर्धेत धामी व ठुकराल यांनीही उपद्रवमूल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे.
टेहरी मतदारसंघात इच्छुकांची तू-तू मंै-मैं सुरू असून, त्यांनी आताच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. सध्याच्या खासदार माला राजलक्ष्मी शाह अकार्यक्षम असल्याचा आरोप इतर इच्छुकांनी केला. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर केला. तो अहवाल खोटा असून आपणास उमेदवारी मिळू नये, यासाठी केलेला कट असल्याचा आरोप राजलक्ष्मी यांनी केला. पक्षनेतृत्वाने त्यांच्याविरोधातील तक्रारीची दखल घेत यंदा तिकीट न देण्याचे ठरविल्याचे समजते. मात्र, भाजपाने त्यांना तिकीट न दिल्यास काँग्रेस त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
दलित समाजाचे नेते केंद्रीय मंत्री अजय टामटा हे अल्मोडातून गेल्या वेळी निवडून आले. यंदा त्यांना पुन्हा त्या मतदारसंघात विजयी होण्याची खात्री वाटत नाही. त्यामुळे ते नैनितालमधून प्रयत्नशील आहेत.
पौडी लोकसभा मतदारसंघातही भाजपाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. सध्याचे खासदार बी. सी. खंडुरी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला असून, त्यामुळे तेथून मंत्री सतपाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. हरिद्वारमध्येही माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल व भाजपाचे दिग्गज नेते व मंत्री मदन कौशिक यांनी या जागेवर दावा करून पक्षासमोर पेच निर्माण केला आहे.
>काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश या राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काँग्रेसला गेल्या वेळी एकही जागा जिंकता आली नाही. पण बसपानेही ४.७३ टक्के मते मिळवून, तिसरे स्थान मिळविले होते. आताही बसपा आणि सपा या राज्यात आपले उमेदवार उभे करणार असल्याने चुरस होण्याची शक्यता आहे.
प्रचारातून मोदीविरोधी जनमत तयार करण्यात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळू शकते. मात्र, बसपाने काँग्रेसशी देशात कोठेही आघाडीसाठी अनुकूलता दर्शविली नसून, सध्या तरी भाजपामधील नाराजांना सामावून घेऊन उत्तराखंडमधील अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.