“कोरोना लस मोफत दिल्याबाबत PM मोदींच्या आभाराचे फलकही लावा”: सुजय विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:34 PM2021-07-12T18:34:31+5:302021-07-12T18:35:46+5:30
एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे.
नगर: एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारवर विरोधक यावरून सातत्याने टीका करताना दिसत आहे. मात्र, इंधनदर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा, असे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. (bjp sujay vikhe patil react on fuel price hike and criticises thackeray govt)
डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या एका रुग्णालयाचे अर्बन सेंटर नगर शहरात सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुजय विखे पाटील आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची पाठराखण केली आहे. ३५ हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच काम राज्य सरकारकडे होते, तेव्हा जागतिक निविदा काढूनही त्यांना ते करता आले नाही, अशी टीका सुजय विखेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका
जनहिताच्या कामाची नोंद घेतली पाहिजे
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ही बाब खरी आहे. मात्र, इंधनदरवाढ झाली असली, तरी त्यासोबत केंद्राकडून देण्यात येणाऱ्या सुविधाही पाहायला हव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या या जनहिताच्या कामाचीही नोंद घेतली पाहिजे. दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम
ते सर्व नाटक आहे
महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाल्याचे भासवले जात आहे. ते सर्व नाटक आहे. राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा सुजय यांनी केला आहे. तसेच अस्तित्वाची लढाई म्हणून हे सर्वजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. एवढ्या सहजासहजी ते वेगळे होणार नाहीत. फार तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढवतील मात्र, विधानसभा, लोकसभेला एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील अनेक प्रश्न हातळण्यात सरकार अपयश ठरले आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या वादाला हवा भरली जात असल्याचा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज नाहीत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणत्याही नेत्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात आत्मीयता असते. त्यामुळे आपल्या नेत्यासाठी त्यांना पक्षाकडून अपेक्षा असणे सहाजिक आहे. पक्ष प्रत्येकालाच खूष करू शकत नाही. याचा विचार कार्यकर्त्यांनीही केला पाहिजे. माझ्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा होतीच. मला स्वत:ला त्याचे काहीच वाटत नाही. भाजपमध्ये मंत्री आणि खासदार यांना समानच वागणूक मिळते, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी मुंडे समर्थकांच्या नाराजीवरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.