सत्ताधारी पक्षाच्या ‘त्या’ नेत्याविरोधात अत्याचाराचा आरोप; भाजपा केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:41 PM2021-04-08T14:41:15+5:302021-04-08T14:46:18+5:30
भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे.
मुंबई – सत्ताधारी पक्षाचे नेत्याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या नेत्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र पाठवलं आहे. त्या प्रकरणी भाजपा महाराष्ट्रची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे गेली २ वर्ष रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला दिशा देतात. त्यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात महिला आयोगाला गेली दीड वर्ष झाली तरी अध्यक्षच नाही. म्हणून यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे.
काय आहे हे प्रकरण?
सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. माझी हत्या करण्यापूर्वी मला न्याय द्या अशी विनवणी या महिलेने पत्रात केली आहे. हे पत्र संबंधित महिलेने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या महिलेने पत्रात लिहिलं आहे की, मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा. देशातील महिला वास्तविक सुरक्षित आहेत का? सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत. मला, माझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईक, मित्रपरिवाराला वेगवेगळ्या कारणानं त्रास देत आहेत. प्रत्येक वेळी विविध गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी मला विविध पोलीस स्टेशनला बोलावतात. माझं चारित्र्यहनन आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं या महिलेने पत्रात लिहिलं आहे.
जे रोज गेली सुमारे दीड वर्षे रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देतात, त्यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे. pic.twitter.com/WAHE6eSrYz
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 8, 2021
तसेच ही गोष्ट मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना सांगितल्यानंतरही माझा छळ थांबला नाही. मी वैयक्तिक सुप्रिया सुळे, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे यांना समस्या सांगितली पण मदत मिळाली नाही. मात्र या लोकांना समस्या सांगितल्यानंतर आणखी त्रास वाढला हे सत्य आहे असं त्या महिलेने म्हटलं आहे.