२०२४ मध्ये भाजपाला मिळतील ४०० हून अधिक जागा, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कारण
By बाळकृष्ण परब | Published: January 7, 2021 03:38 PM2021-01-07T15:38:51+5:302021-01-07T15:43:49+5:30
Chandrakant Patil News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कणकवली - २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत देशाची एकहाती सत्ता मिळवली होती. दरम्यानच्या काळात भाजपाचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकित केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांना समर्थन देण्यासाठी भाजपाने आज कणकवलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्या विजयाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवला होता.
दरम्यान, या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राहुल गांधी आणि मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राणे यांनी सांगितले.